मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी- मी त्याचा सूड घेईन! मी जिंकेन मरणाला! मला कैवल्यवाणी येते.... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र! आणि दुसर्याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणार्या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं. ती पोथी वाचायची असा निश्र्चय करून! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता. मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृध्द दर्शन घडत राहावे.