प्राचीन भारतातील कालखंडांवर, व्यक्तिमत्त्वांवर आधारित कादंबऱ्या-पुस्तके, अभिजात विषयांवरील कादंबऱ्या, सकारात्मक विषय, मनाला उभारी देणारी पुस्तकं प्रकाशित करण्याची आमच्या 'विहंग प्रकाशन संस्थे'ची परंपरा आहे. डॉ. आरती दातार लिखित 'शून्याकडून सूर्याकडे' हे आमच्या परंपरेत बसणारं असंच एक पुस्तक. विपरीत परिस्थितीविरुद्ध यशस्वी लढा देऊन डॉ. अरुण दातारांनी जे विजिगीषू वृत्तीचं दर्शन घडवलं आहे त्याचं साद्यंत वर्णन प्रस्तुत पुस्तकात आहे.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ऐन तिशीच्या उंबरठ्यावर झालेल्या अपघातात डॉ. अरुण यांचा एक पाय पूर्णत: जायबंदी झाला. त्यानंतर त्यांच्यावर झालेले उपचार, वाट्याला आलेला आशा-निराशेचा खेळ, चाळीस टक्के संभाव्य राहणारी शारीरिक असमर्थता, विपरित परिस्थितीशी झगडताना आलेले कडुगोड अनुभव आणि या सर्वांवर समर्थपणानं मात करून आयुष्यात पुन्हा उभे राहिलेले डॉ. अरुण आणि डॉ. आरती दातार यांच्या विषयीचा सारा लेखाजोखा या पुस्तकात स्वत: डॉ. आरती दातार यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. या उभयतांनी प्राप्त परिस्थिती आनंदानं स्वीकारली. संकटाशी सामना करून मार्ग काढला; आणि आज ते दोघे आपापल्या क्षेत्रात मोठ्या धडाडीनं उभे राहिले, यशस्वी झाले.