शुभांगी पासेबंद लिखित राहू दे घरटे या पुस्तकामध्ये महिलांचे प्रश्न, मुलींची दुर्दशा, स्त्री भ्रूणहत्या त्यावर उपाय दाखवायचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे. एखाद्या स्त्री ने समाजात न घाबरता स्वतःच्या हिमतीवर आपले वेगळे स्थान कसे निर्माण करावे हे या कादंबरीत सविस्तर पणे सांगितलेले आहे. प्रस्तुत कादंबरीतली नायिका, आईची लाडकी लेक, लेखिकेने तिच्या गुणवत्तेतून, निरीक्षणातून रेखाटल्याचं जाणवतं. भोगवादाचा उच्छाद आजही स्त्रीच्या माथी मारला जातोय. कुटुंबातलं विस्कटलेपण आणि नात्या-नात्यातली बेबनावगिरी या कहाणीत दिसून येते. एकीकडे समाजात स्त्रियांच्या कर्तबगारीचे ढोल बडवले जातात असं चित्र आहे; तर दुसरीकडे स्त्री कितीही प्रगल्भ, विचारशील असली तरी तिचा मानसिक, शारीरिक छळ व शोषण अव्याहतपणे सुरूच आहे.