माणूस म्हणून जगण्यासाठी हे पुस्तक स्वातंत्र्य, असंघटितांची संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून दुर्बलांना सामर्थ्यवान बनविण्याच्या प्रक्रियेवर आधारित आहे. विकासाची नेमकी व्याख्या समजून घेतल्याशिवाय या प्रक्रियेचे आकलन होणार नाही. रस्ते, पूल, उड्डाणपूल, गगनचुंबी इमारती, दूरसंचार व संपर्काची साधने, वीज निर्मितीचे नेत्रदीपक प्रकल्प, गोल्फ क्लब, झगझगते मॉल्स, विशेष आर्थिक क्षेत्र यावर विकास तोलला असता भ्रामक चित्र उभे राहते. स्थिरावलेल्या पारंपरिक अर्थव्यवस्थेला धक्के देत आधुनिक अर्थव्यवस्था गती घेत असल्याचे यावरून स्पष्ट होते, यात शंका नाही. खरा विकास या प्रगतीच्या पलीकडे व अधिक मूलभूत असतो. अन्न, आरोग्य, शिक्षण, पाणी, लसीकरण, पोषण, स्वच्छता, वीज या पलीकडे मानवी मनाचा स्वातंत्र्य व सहजतेच्या वातावरणात झालेला विकास म्हणजेच खरा विकास होय. अन्याय-अत्याचाराला मूक संमती असणे, शोषणासमोर गुडघे टेकणे, यथास्थिती मान्य करणे, गुलामीचे जिणे निमूटपणे स्वीकारणे, या व अशा शांततेच्या संस्कृतीचे परिवर्तन हाच विकासाचा मार्ग आहे.