महाराष्ट्राचा दुसरा शिवाजी अन्धकारमय स्थितीत अन्तर्धान पावत असल्याचे चित्र मनावर खोल जखम करते. बाजीरावाची कथा व मस्तानीची व्यथा प्रा. मुरलीधर जावडेकर यांनी आपल्या समर्थ लेखणीने एक अमर कलाकृती म्हणून या नाटकाच्या रूपाने मराठी वाचकांसमोर मांडली आहे. नाट्याच्या पानोपानी बाजीरावाची मनोव्यथा त्याच्या हृदय पिळवटून निघालेल्या शब्दांत व्यक्त होते. छत्रपतींच्या दरबारी बाजीरावाबद्दल किल्मिष ओतणारे स्वर्थलंपट मुत्सद्दी, त्यांचे विचार आणि बाजीरावाची धडाडी यांतील भेद उत्कृष्टपणे उकलून दाखविला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक उत्कट भावमधुर पण अंती करुण अशा बाजीराव व मस्तानी यांच्या नितांत सुंदर प्रेमकथेवर आधारलेले पण त्या कथेचे शृंगार, शौर्य, त्यात यांचे पापुद्रे अलगद बाजूस करून आतील करुण, दाहक मनोव्यथेचे असंख्य थर नाजुकपणे उकलून एका शोकांतिकेच्या मुळाशी जाऊन ते कौशल्याने वाचकांसमोर लेखकाने नाटकाच्या रुपाने ठेवले आहे.