गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. या वास्तूत एक एक व्यक्ती अनाकलनीय शक्तीला सामोरी जाते आणि गडप होते; पण काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि वास्तू पवित्र, पिशाचमुक्त होते. कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा नारायण धारपलिखित "चेटकीण' ही कादंबरी.
अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते. धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणाऱ्या धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही. कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणाऱ्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणाऱ्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.