भारत हा शेतीप्रधान देश आहे. प्राचीन काळापासून कित्येक लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेती, शेतकरी हा सर्वांचाच खुप जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्याला अन्नदाता, कष्टकरी, पोशिंदा या नावांनी संबोधले जाते. या क्षेत्रात हरितक्रांती, धवलक्रांती, जलक्रांती, यांसारख्या वेगवेगळ्या क्रांती होत आहेत. देश प्रगती करत आहे. या पुस्तकात कोणतेही तत्वज्ञान नाही, कोणताही उपदेश नाही. आहेत ते नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन! आज देशाने कितीही प्रगती केली असली तरी शेतकरी हा म्हणावा तितका प्रगती करताना दिसत नाही. दुष्काळ, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा आणि त्यातुन येणारे नैराश्य यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. काहीही करून हे थांबले पाहिजे. त्यासाठीच या भल्या मोठ्या जगात या अडचणींवर मात करण्यातला खारीचा वाटा म्हणुन लेखकाने त्याचे विचार या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले आहेत.